ग्रामीण भागासाठी सूर्यघर मोफत वीज योजना
केंद्र शासनाने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यात एक ते तिन किलोवॅट क्षमतेच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला ३० ते ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.या योजनेतील ग्राहकाच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास ती त्यांना महावितरणला विकता येणार आहे. तसेच संबंधिताला मोफत वीज मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनी या योजनेत सहभाग घ्या, असे आवाहन महावितरणच्या पाली विद्युत शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता धनाजी कळेकर यांनी केले. महावितरणच्या पाली शाखा कार्यालयाच्याकडून ग्रामसभेत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची प्रसिद्धीसाठी पाली परिसरात व महिला बचतगटांच्या प्रभाग संघ बैठकीत पत्रकांचे वाटप करण्यात आले. या वेळी माहिती देताना सहाय्यक अभियंता कळेकर यांनी सांगितले, भविष्याचा विचार करता सौरऊर्जा ही फायदेशीर आहे. कारण ती पुरेशा प्रमाणात मोफत उपलब्ध असून प्रदूषणविरहित ऊर्जा मिळू शकते. त्याच बरोबर विजेच्या उपलब्धतेबाबत स्वावलंबी होऊ शकतो. त्यामुळे मोफत सूर्यघर योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेतला पाहिजे.