
कोल्हापुरात दोघा सराईतांनी कामगाराला दोरखंडाने बांधून, पिस्तुलासह चाकूचा धाक दाखवून 13 लाख 29 हजारांची रोकड लुटली
कोल्हापुरी शहरातील शाहूपुरी येथील मध्यवर्ती शहाजी लॉ कॉलेजसमोर साईक्स एक्स्टेंशन परिसरात गजलता आर्केड या व्यापारी संकुलातील तळघरात व्यापारी ललित बन्सल (रा. नागाळा पार्क) यांच्या कार्यालयात घुसून दोघा सराईतांनी कामगाराला दोरखंडाने बांधून, पिस्तुलासह चाकूचा धाक दाखवून 13 लाख 29 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी घडली.मध्यवर्ती चौकात घडलेल्या प्रकारामुळे व्यापारीवर्गासह शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सराईत लुटारूचा माग काढण्यासाठी शहर, उपनगरासह जिल्ह्यात नाकाबंदी केली व वाहन तपासणीचे आदेश दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मध्यवर्ती बसस्थानक, प्रमुख चौक, महामार्गावरही तपासणी सुरू होती.शनिवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली. तोंडावर मास्क आणि हेल्मेट घातलेले संशयित दुचाकीवरून आले होते. व्यापारी बन्सल यांच्या कार्यालयात घुसलेल्या संशयितांनी कामगार लक्ष्मण विलास कानेकर (वय 48, रा. दौलतनगर, कोल्हापूर) यांच्यावर प्रचंड दहशत निर्माण केली.एका संशयिताने कानेकर यांच्या पोटावर पिस्तूल लावले तर दुसर्याने धारदार चाकू त्यांच्या गळ्याला लावला.ओरडण्याचा प्रयत्न केलास तर ठार मारण्याची धमकी देत त्यांनी त्यांचे दोन्हीही हात दोरखंडाने बांधले. ‘तुम चिल्लायेगा तो मार देगे, पैसा किधर है’, असे बजावत त्यांना कार्यालयातील एका कोपर्यात ढकलून देऊन मारहाण करण्यात आली. व्यापारी बन्सल यांच्या केबिनमधील कपाटातील 13 लाख 29 हजार 400 रुपयांची रोकड हिसकावून घेऊन संशयित दुचाकीवरून पसार झाले.