आंबा घाटातील सडा पॉईंट येथे दोन युवकांचे मृतदेह सापडले, गुरूंचा मृत्यू झाल्याने नैराशेतून आत्महत्या केल्याचा संशय
आंबा (ता. शाहूवाडी) येथील सडा पॉईंट नावाच्या अडीचशे फूट खोल दरीत दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. स्वरूप दिनकर माने (रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि सांगली) व प्रशांत श्रीरंग सातवेकर (वय 19, रा निपाणी) अशी मृत युवकांची नावे आहेत.पावसाची रिपरिप, धुके व 100 फूट अंतरावर खोल दरीत असलेले मृतदेह काढण्यास अडचण निर्माण झाल्याने शनिवारी शोध मोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली.घटनास्थळापासून काही अंतरावर मोटारसायकल उभी करण्यात आली होती. वन विभागाचे कर्मचारी जंगलात फेरफटका मारत असताना त्यांच्या निदर्शनास मोटारसायकल आली. ही घटना शाहूवाडी व साखरपा पोलिसांना समजतात घटनास्थळी दोन्ही पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करता मृतदेह खोल दरीत असल्याने बाहेर काढण्यास अडचण निर्माण होत होती. त्यातच शनिवारी पाऊस असल्याने अडचण येत असल्याने मृतदेह काढण्याची मोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा मृतदेह काढण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे . मृतदेह बाहेर काढल्यानंतरच या दोन युवकांची अधिक माहिती उपलब्ध होईल. नेमकी आत्महत्या की घातपात अशी चर्चा घटनास्थळी होती. मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यातआले.स्वरूप माने व प्रशांत सातवेकर हे दोघे कागल येथील एका मठात तीन वर्षांपासून राहात होते. येथील महारांजाचा मृत्यू एक महिन्यांपूर्वी झाला होता. महाराजांचा विरह सहन न झाल्याने नैराश्यातून या दोघांनी सडा नावाच्या दरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.