संरक्षण प्रदर्शन व परिसंवाद रविवारी उद्योग विभाग व निबे ली. यांच्यात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीसाठी होणार सामंजस्य करार रत्नागिरी, दि.१७ :(जिमाका)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने देशाच्या संरक्षण क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचे व सामरिक क्षमतांचे प्रदर्शन करणारे ‘संरक्षण प्रदर्शन व परिसंवाद २०२४ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी खासदार नारायण राणे, सिंधूरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित राहणार आहेत. उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे ली. यांचेमध्ये संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. प्रदर्शनात भारताच्या संरक्षण दलांनी विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, उपकरणे, तंत्रज्ञान, तसेच स्वदेशी संशोधन व विकासातील उपलब्धींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विविध सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या, तंत्रज्ञ, आणि संशोधक आपल्या उत्पादनांचे आणि सेवा यांचे प्रदर्शन करतील. संरक्षण मंत्रालयाच्या विविध योजना, धोरणे आणि पुढील काळातील आराखड्यांविषयी माहिती देणारी सत्रे देखील आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनामुळे रत्नागिरीच्या जनतेला संरक्षण क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळेल आणि युवकांना या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी प्रेरणा मिळेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.