राज्यात १४३ महिला चालक करीत आहेत एसटीचे सारथ्य
लालपरी अर्थात एसटीचे स्टेअरिंग परींच्या हाती आले आहे. राज्यात सध्याच्या घडीला १४३ महिला चालक एसटीचे सारथ्य करीत आहेत. लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवत आहेत.एसटी महामंडळ राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासी वाहतूक करते. महामंडळात यापूर्वी चालक आणि वाहक म्हणून पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु महामंडळाने महिलांची वाहक म्हणून नेमणूक केली. सध्या महामंडळाकडे ४ हजार ३८३ महिला वाहक आहेत. त्यानंतर एक पाऊल पुढे टाकत महिलांना चालक म्हणून सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार महिला चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती प्रक्रिया वर्ष २०१९ मध्ये राबविली. या भरती प्रक्रियेत महिलांचे एकूण ६०० अर्ज आले होते. कागदपत्रांची छाननी करून त्यातून सर्वसाधारण भागांतील १९४, तर आदिवासीभागातील २१ महिलांची निवड झाली. प्रशिक्षणानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणीनंतर या महिला चालक २०२१ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण रखडले. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यांनतर या उमेदवारांचे एक वर्ष अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे टेस्टिंग ट्रक आहे, तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड होत आहे. महामंडळाने महिलांना प्रशिक्षणादरम्यान महिलांना वळण मार्गावर एसटी चालवण्याचे प्रशिक्षण दिले. घाट चढणे, वळण घेणे, गर्दीतून एसटी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एसटी चालवण्याचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच एसटीचे स्टेअरिंग हाती दिले आहे. महिला चालकांना रोज दहा किलोमीटरवर बस चालविणाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये घाट, रात्रीच्या वेळेस येणारे अडथळे, गर्दीच्या ठिकाणी, राष्ट्रीय महामार्गावरील प्रशिक्षणाचा समावेश आहे. राज्यातील विविध आगारांमध्ये चालक म्हणून महिला रूजू होऊन विविध लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील मार्गावर एसटी चालवित आहेत.