रत्नागिरीच्या कामगार कल्याण केंद्रासाठी प्रशासकीय भवनात जागा मिळावी पालकमंत्री ना. उदय सामंत यांना कामगार कल्याण केंद्रातर्फे निवेदन
रत्नागिरी प्रतिनिधी : येथील कामगार कल्याण केंद्र १९७१ – ७२ सालापासून पासून निरनिराळ्या ठिकाणी तुटपुंज्या भाड्याच्या जागेत चालविले जात आहे. त्यामुळे केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविणे या केंद्राला अडचणीचे होत असल्याने या केंद्राला रत्नागिरी येथील नवीन प्रशासकीय भवनामध्ये प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रत्नागिरी येथील कामगार कल्याण केंद्राच्या संचालिका श्रीमती संस्कृती शिंदे यांनी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.रत्नागिरी एमआयडीसी आणि विविध उद्योग क्षेत्रातील कामगार आणि कामगारांच्या कुटुंबीयांसाठी शिशु मंदिर, शिवण वर्ग ग्रंथालय अभ्यासिका, क्रीडा व क्रीडा स्पर्धा, बालनाट्य, महिला नाट्य, यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कामगार कल्याण केंद्रामार्फत प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशस्त जागेची गरज असल्याने मंत्री महोदयांनी या मागणीचा प्राधान्याने विचार करून प्रशासकीय भवनात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये समाजभूषण श्री सुरेंद्र घुडे, भारत सावंत, ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश होता.