
मुंबई शहरातील पासपोर्ट कार्यालयातून दिवसाकाठी पाच हजारांवर पासपोर्ट जारी
देशात पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, मुंबई शहरातील पासपोर्ट कार्यालयातून दिवसाकाठी पाच हजारांवर पासपोर्ट जारी केले जात आहेत.एकीकडे पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत जरी मोठी वाढ होत असली तरी तितक्याच सक्षमतेने आणि जलदरीत्या पासपोर्ट वितरित केले जात आहेत. पासपोर्ट विभागाची स्वतःची वेबसाइट असून, तेथे अर्जदारांनी अर्ज भरावा. मात्र, अलीकडच्या काळात अनेक लोकांनी पासपोर्टसाठी अर्ज करा किंवा पासपोर्ट काढा, अशा बनावट वेबसाइट सुरू केल्या आहेत. त्या वेबसाइटदेखील विभागाच्या वेबसाइटसारख्याच हुबेहूब केलेल्या आहेत. त्यामुळे अशा वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज भरू नये किंवा त्यावर पैसेदेखील भरू नयेत. या वेबसाइट निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्काची आकारणी करतात. तसेच अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमची पासपोर्टसाठीची अपॉइंटमेंट झाल्याचेही सांगतात. पण, ते सत्य नाही. ती फसवणूक आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरणा करावा.