
सात बहिणी डोंगरात पर्यटनासाठी गेलेले हजारो पर्यटक अडकले पुरात!
चंद्रपूर : अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने नागभिड तालुक्यातील सातबहिणी डोंगर (पेरजागड) परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले हजारो पर्यटक पुरात अडकले. मात्र तळोधी (बा.) आणि नागभिड पोलिसांनी पावसातच घटनास्थळी पोहचून पर्यटकांना बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना काल (गुरूवारी) सायंकाळच्या सुमारास समोर आली.जुलै महिण्यापासून जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, तलाव तुडूंब भरले आहेत. मध्यम व लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच नैसर्गीक सौंदर्यही बहरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांपैकी नागभिड तालुक्यायातील सोनापूर जवळ सातबहिणी (पेरजागड) डोंगर आहे. काल (गुरूवार) सातबहिणी पर्यटनस्थळावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे आठ ते दहा हजार पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती.पर्यटक डोंगरावर चढले. या परिसरातील सौंदर्य न्याहाळत असताना अचानक दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून आकाशात काळेकुठ्ठ ढग जमा झाले. काही वेळातच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. आठवडाभरापासून विसावलेल्या पावसाने नाल्यातील पाणी ओसरले होते. परंतु मुसळधार पावसाने पाहता-पाहता डोंगराच्या सभोवताल असेलेले नाले भरभरून वाहू लागले. पर्यटन स्थळापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या सोनापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरपरिसरात वाहून येणारे पाणी वाढल्याने नाल्याला पूर आला. त्यामुळे हजारो पर्यटक सातबहिणी डोंगर पायथ्याशी अडकून पडले आणि संततधार पावसाने त्यांना बाहेर पडता आले नाही. घनदाट जंगलात असलेल्या या पर्यटनस्थळाच्या सभोवती वाघ, बिबट, अस्वलासारख्या हिस्त्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे पर्यटकांचे जीव धोक्यात आले होते.नाल्याला पूर आल्याने अनेक पर्यटक सोनारपूर नाल्याजवळ अडकले, तर अनेक पर्यटक डोगर पायथ्याशीच थांबले होते. या घटनेची माहिती पोलिस विभाग, वनविभागाला देण्यात आली. दोन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपासून रात्रीपर्यंत मोहिम राबवून अडकलेल्या पर्यटकांना पुरातून मोठ्या जिगरबाजीने बाहेर काढण्यात आले. पर्यटक हे हजारोंच्या संख्येने असल्याने पर्यटकांना रेस्क्यू करण्याची मोहीम रात्रीपर्यंत राबविण्यात आली. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी वेळेत धावून आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मोठा अनर्थ टळला.विशेष म्हणजे काल 15 ऑगस्ट असल्यामुळे ध्वजारोहणानंतर लोकांनी पर्यटनासाठी ठिकठिकाणी भेट देत असतात. काल दुपारपर्यंत वातावरण चांगले होते. परंतु अचानक दोन वाजल्यापासून आकाशात काळेभोर ढग जमले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. यामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांचे जीव वाचविण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पर्यटकांना जीव मुठीत घेऊन पर्यटन करावे लागते. सातबहिणी डोंगर परिसरातच घोडाझरी पर्यटन स्थळ आहे. तसेच मुक्ताई धबधबा आहे. त्यामुळे या परिसारातून पर्यटन करून सातबहिणी डोंगरावर मोठी गर्दी पहायला मिळाली. परंतु पोलिस व वनविभाग पर्यटकांच्या मदतीसाठी धावून आल्याने मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रीया पुरातून सुखरूप बाहेर पडलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली.