
लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करता येणार,जवळपास ३३ लाख महिलांच्या खात्यावर रक्कम जमा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्या महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी ही मुदत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर, तुमच्या सावत्र भावांनी या योजनांवर टीका केली. या योजना पूर्ण होणार नाहीत, अशा नकारात्मक गोष्टी पसरवल्या; मात्र आता या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विरोधकांना चांगलाच घाम फुटला आहे. त्यामुळे हे विरोध करणारे तुमच्यासमोर आले तर त्यांना जोडे दाखवा,’ असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच खडसावले. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.लाडकी बहीण योजनेची मुदत आम्ही सप्टेंबरपर्यंत वाढवली असून, येत्या १७ तारखेपर्यंत योजनेचे दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते असे एकूण ३,००० रुपये या महिलांच्या खात्यात जमा होतील, असे जाहीर करण्यात आले होते; मात्र त्याआधीच जवळपास ३३ लाख महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे १७ तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यातदेखील रक्कम जमा होणार आहे. हे सरकार जे बोलते ते करते. कोट्यवधींमध्ये लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयाची किंमत नाही; मात्र आमचे कुटुंब चालवताना माझ्या आईला जे कष्ट करावे लागले ते कष्ट मी पाहिले आहेत. त्यामुळे या दीड हजाराची किंमत मी जाणतो,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.