
राजापूर येथील पंचायत समितीची इमारत तांत्रिक अडचणीत सापडली
सर्व कार्यालये एकाच छताखाली यावीत यासाठी पंचायत समितीची एकच प्रशस्त नवी इमारत उभाण्याचे काम तांत्रिक अडचणीत सापडले आहे. राजापूर पंचायत समितीची जुनी इमारत असलेली जागा जिल्हा परिषदेच्या नावे नाही. त्यामुळे जागा हस्तांतरणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तो प्रस्ताव गेल्या २० महिन्यांपासून शासनदरबारी बासनात गुंडाळलेला आहे. पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या मागणीप्रमाणे जागा हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेचे गुर्हाळ ठरलेला आहे. त्यामध्ये सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील पंचायत समितीच्या सुसज्ज इमारती उभ्या राहत असताना राजापुरात पंचायत समितीची सुसज्ज इमारत कधी उभारली जाणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुमारे ६ हजार २४८ चौ. फूट (५८०.६९ चौ. मी.) असलेल्या राजापूर पंचायत समितीची सध्याची इमारत १९७२ मध्ये बांधण्यात आलेली आहे. पारंपारिक पद्धतीच्या कौलारू छप्पर असलेल्या या मुख्य इमारतीमधून तालुक्याचा प्रशासकीय कारभार हाकला जात आहे. ५० वर्षापूर्वी बांधलेली ही इमारत पंचायत समितीच्या सर्व विभागांची प्रमुख कार्यालये सामावून घेण्याऐवढी मोठी नसल्याने ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग आदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही विभागांची कार्यालये पंचायत समितीच्या या इमारतीत आहेत. काही विभागांची कार्यालये सध्या स्वमालकीच्या स्वतंत्र इमारतीत असून काही कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. www.konkantoday.com