
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत विद्यार्थिनी आदिती साळवी हिला ध्वजारोहणाचा मान
रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव (ता. रत्नागिरी) येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बीसीए कॉलेजमध्ये प्रथम आलेल्या अदिती अजित साळवी हिला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला.अदिती म्हणाली की, गेल्या वर्षीपासून महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला ध्वजारोहणाचा मान मिळतोय. आज तो मला मिळाला. अशी संधी देणारे हे पहिलेच महाविद्यालय असावे. कॉलेजच्या अभ्यासेतर उपक्रमांमुळे करिअर, व्यक्तीमत्वात बदल झाला. यामुळे पुढची आव्हाने पेलण्यासाठी मी तयार झाले. इंग्लिश स्पिकींग, जर्मन लॅंग्वेज, सॉफ्टवेअर टेस्टिंग, मल्टीमिडीया, अॅनिमेशन तसेच इस्रो वर्कशॉप, कोर्सेस असोत. इलेक्ट्रॉनिक्स, मेकाट्रॉनिक्स या उपक्रमांचा फायदा मला व मैत्रिणींना मिळाला आहे.प्रमुख पाहुणे बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी म्हणाले की, ७८ व्या वर्षात भारताची एवढी प्रगती झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातली पाचव्या क्रमांकाची झाली असून ती अधिक बळकट होणार आहे. अशा वेळी प्रत्येक भारतीयाने आपली जबाबदारी काय आहे, हे जाणले पाहिजे. प्रत्येकाने १० टक्के वेळ देशासाठी दिला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग होत असल्याने प्रत्येकाने किमान पाच झाडे लावा व जगवा, तसेच दिवसाला १ लिटर पाणी वाचवा, असा संदेश रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी यांनी दिला.या वेळी संस्था प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी सांगितले, आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत याचे श्रेय स्वातंत्र्यसैनिकांना दिले पाहिजे. आज भारत जगातली तिसरे आर्थिक साम्राज्य उभे करत आहे. अशा वेळी आपली भूमिका काय हे पाहिले पाहिजे. करिअर करताना देशासाठी थोडा वेळ द्या. मी, माझी नोकरी, कुटुंब एवढाच विचार न करता देशाचा विचार करा. राष्ट्र मोठं करायचं असेल तर राष्ट्र प्रथम, दिवसातला वेळ द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे भारतात तयार झालेलीच वस्तू घ्या.या वेळी आर्किटेक्ट तेजल साळवी, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंतदेसाई, सदस्य शिल्पा पानवलकर, बीसीए कॉलेज प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेज प्र. प्राचार्य अर्चना बाईत, आदितीचे वडिल अजित साळवी, आई सौ. अनुपमा साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवण्यात आले. सौ. प्रतिभा लोंढे आणि सौ. गौरी भाटकर यांनी सूत्रसंचालन केले.