प्रादेशिक मनोरुग्णालय येथील इमारत बळकटीकरण भूमिपूजन रुग्णांच्या सेवेतून, उपचारातून पुण्य मिळेल -पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, : मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर घरच्या व्यक्तीप्रमाणे भावनिकतेने सेवा आणि उपचार करावेत, त्यातून पुण्य मिळेल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. प्रादेशिक मनोरुग्णालयातील इमारतीचे बळकटीकरण भूमिपूजन सोहळा पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन काल झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, मनोविकृती तज्ज्ञ डॉ. संजय कलकुटगी, विजय खेडेकर, बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, बाबू म्हाप आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांकडून पसंती दिली जाते, ही अभिमानाची बाब आहे. मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडे भावनिकपणे पाहिले पाहिजे. त्यातूनच त्यांचा पुनर्विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातीलच व्यक्ती आहे, असे समजून रुग्णांवर उपचार केल्यास तो लवकर उपचार करुन स्वत:च्या घरी परतेल, यातून पुण्यच मिळेल. रुग्णसेवा करणाऱ्यांना ब्रदर्स आणि सिस्टर्स असे म्हटले जाते. बहीण आणि भाऊ या नात्यांप्रमाणे रुग्णांची सेवा केली पाहिजे. त्यातून दृढ नातं निर्माण झालं पाहिजे. पहिल्या तासातच रुग्ण बरा झाला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे. *जर्मन भाषेचा कोर्स सुरु करा* जर्मनी देशाशी वैद्यकीय क्षेत्राबाबत टायअप केले आहे. 4 लाख लोकांची कमतरता तिथे आहे. त्यासाठी जर्मन भाषा येणे आवश्यक आहे. आपल्या इथल्या नर्सेस आणि ब्रदर्स यांना जर्मनी देशात चांगल्या पगारावर सेवा देण्यासाठी जायचे असेल तर, जर्मन भाषा येणे आवश्यक आहे. त्यासाठी जर्मन भाषेचा कोर्स सुरु करा. त्याला लागणार निधी जिल्हा नियोजन मधून दिला जाईल, असे पालकमंत्री म्हणाले. मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. फुले यांनी स्वागत प्रस्ताविक केले. प्रादेशिक मनोरुग्णालयाबाबत इतिहास, कायदे, सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मनोविकृती तज्ज्ञ डॉ. कलकुटगी यांनी सर्वांचे आभार मानले.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button