
राज ठाकरेंनी अमित ठाकरेंवर सोपवली नवी जबाबदारी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच मनसेच्या मुंबई अध्यक्ष पदाची घोषणा केली.संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पक्षाची केंद्रीय समितीही जाहीर केली.राज ठाकरे यांनी संघटनेत पहिल्यांदाच एवढे मोठे बदल केले आहेत. केंद्रीय समितीची जबाबदारी नितिन सरदेसाई यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत नवीन पदांची रचना केली आहे. मनसेचे नते बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय गट अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे.
मुंबईतील विभाग अध्यक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या केंद्रीय समितीचे नेतृत्व नितीन सरदेसाई करणार आहेत. मुंबई मनसे गटाध्यक्ष केंद्रीय समिती मध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गटाध्यक्ष महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नांदगावकर, अभ्यंकर या अनुभवी नेत्यांवर राज ठाकरेंनी ही जबाबदारी सोपवली आहे.




