
जिल्ह्यात महावितरणाचे अंदाजे २५ कोटींचे नुकसान निसर्ग वादळाचा फटका
निसर्ग वादळाचा अनेक भागात बसला असला तरी सर्वात जास्त फटका मंडणगड, दापोली भागात बसला असून तेथे महावितरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामुळे जिल्हयात महावितरणाचे अंदाजे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज बाेलताना पत्रकारांशी दिली. वादळी पावसामुळे मंडणगड, दापोली व जिल्ह्यातील अन्य भागात लाईट पोलची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अंदाजे ९३० पेक्षा अधिक पोल पडले आहेत. जिल्ह्यात एकूण एमएसईबीचे ५ लाख ७५ हजार ग्राहक आहेत. त्यापैकी खबरदारी म्हणून ४ लाख २१ हजार ग्राहकांची वीज बंद ठेवण्यात आली होती परंतु त्यानंतर वादळ संपल्यानंतर यातील अंदाजे अडीच लाख लोकांची वीज चालू करण्यात यश आले आहे. विविध कारणांमुळे अद्यापही दीड लाखांच्यावर ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्यामुळे ही यंत्रणा सुरळीत होण्यास अधिक कालावधी लागणार आहे. तरी देखील महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. महावितरणच्या यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील टेलिफोन यंत्रणा देखील मंडणगड, दापोली भागात ठप्प झाली असल्याने अनेक ठिकाणी संपर्कासाठी वायरलेसचा उपयोग करावा लागत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com