भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण रत्नागिरी जिल्ह्यची विविध क्षेत्रात भरीव प्रगतीकडे वाटचाल -पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत, अन्नपूर्ण योजना, तीर्थदर्शन, मुलींना उच्च शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना राज्य शासनामार्फत सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहे, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्याने विविध क्षेत्रात भरीव प्रगतीकडे वाटचाल कायम ठेवली आहे. विकासाच्या या वाटचालीस रत्नागिरी वासियांचे असेच सहकार्य लाभो, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.* भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आज 15 ऑगस्ट, भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन ! हा मंगलमय दिवस आज देशभर उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने आपणाला शुभेच्छा देणे हे मी माझे भाग्य समजतो. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले आणि त्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अशा सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना याप्रसंगी मी अभिवादन करतो. रत्नागिरी जिल्हा जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यांने केलेला आहे. मागील महिन्यात काही दिवस पावसामुळे विशेषत: राजापूर आणि खेडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून, यांत्रिकी विभाग आणि नाम फाऊंडशेनच्या सहकार्यातून गौतमी नदी रुंदीकरण व खोलीकरण, जगबुडी, वाशिष्ठी, शिव, कोदवली, अर्जुना, मुचकुंदी, काजळी, येरडव, चांदेराई, वैतरणा, शास्त्री आदी नद्यांमधून 6 लाख 44 हजार 739 घनमीटर गाळ काढण्यात प्रशासन यशस्वी झाल्यामुळे पुराचा धोका टळण्यास मदत झाली आहे. एनडीआरएफचे पथक देखील तैनात होते. सुदैवाने यात फार मोठी हानी, विशेषत: जिवितहानी झाली नाही. अशा संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सेवाभावी संस्था यांनी उत्कृष्ट काम केले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या जिल्हावासियांचेही मी आभार मानतो. जिल्ह्यातील विकास कामांसाठी 360 कोटी रुपये इतका निधी जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. विकासात्मक कामाला शासनाने अतिरिक्त 60 कोटी निधी वाढवून दिला आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तहसिलदारांना नवीन वाहने देण्यात यशस्वी झाले. जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे सुसज्य सभागृह निर्माण करण्यात आले आहे. प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद इमारत, पंचायत समिती इमारत या सुसज्य इमारती निर्माण होत आहेत. सुमारे 200 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. महसूलच्या 5 उपविभागीय कार्यालयांना दिलेल्या प्रत्येकी 5 कोटी निधीमधून अत्याधुनिक कार्यालये होत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा राज्य शासनाचा विशेष महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 74 हजार 346 लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ 82 कोटी 30 लाख 38 हजार रकमेचे वितरण होण्यास सुरुवात झाली आहे. वयाची 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 3 हजार रुपयांप्रमाणे 4 हजार 494 लाभार्थ्यांना 1 कोटी 34 लाख 82 हजार वितरण होणार आहेत. अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत 1 मेगाव्हॅट क्षमतेचा गोळप सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाला आहे. भविष्यात आयटी उद्योग रत्नागिरीत आणण्यासाठी विमानतळ सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणून जाणीवपूर्वक विमानतळ सक्षम करत आहोत. 1800 मीटर पर्यंत धावपट्टीचा विस्तार करण्यात आला आहे. 100 कोटी खर्चून होणाऱ्या टर्मिनल इमारतीचे होणार आहे. पाली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनसाठी 3 गुंठे जमीन शासनाने दिली आहे. जिल्ह्यामध्ये असणारे अत्यंत पोषक वातावरणामुळे सर्व तालुक्यांमध्ये खैर लागवडीसाठी चांगल्याप्रकारे वाव आहे. खैर झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. शेतकऱ्यांनी खैर शेती शाश्वतरित्या केल्यास जिल्ह्यात कात उद्योगाला चालना मिळणार आहे. त्यातून चांगला आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. वन विभागाच्या माध्यमातून खैर रोप लागवडीसाठी मोफत देण्यात येणार आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड पाहणी केली. यानंतर संचलनास प्रारंभ झाला. पोलीस मुख्यालय पथक, दंगल नियंत्रण पथक, पोलीस बँड पथक, जिल्हा महिला पोलीस पथक, जिल्हा गृह रक्षक दल आणि डॉग स्कॉड यांचा संचलनात समावेश होता. राखीव पोलीस निरीक्षक रमेश निकम हे कमांडर होते. पालकमंत्री यांच्या हस्ते वीर पत्नी अनुजा ढगळे यांना ताम्रपटाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, अधिकारी कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले.000