
विपरित स्थितीत नियतीसमोर दोनहात करण्याचे धाडस दाखवणार्या हंजला काद्री याचा आदर्श तरूण पिढीने घेण्याची गरज
रत्नागिरी ः जन्मानंतर काही दिवसातच आलेल्या तापाने व काविळीसारख्या आजाराने कायमचे अपंगत्व व दिव्यांग बनून देखील त्यावर संगमेश्वर नायरी येथील राहणार्या हंजला काद्री याने चक्क पायाने पेपर लिहून नियतीने दिलेल्या परिस्थितीवर मात करून एम.ए. पर्यंतच्या शिक्षणापर्यंत पोहोचण्याची धडक दाखविली आहे. आता त्याचे स्वप्न पी.एच.डी. करण्याचे आहे. जर आपणाकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर विपरित परिस्थितीवर देखील कशी मात करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हंजला काद्री याचे आहे. त्याचा आदर्श धडधाकट तरूणांनी घेण्यासारखाच आहे.
संगमेश्वर नायरी येथील हंजला काद्री याचा जन्म झाल्यानंतर काही दिवसानी त्याला ताप व काविळ यासारख्या आजारांनी घेरले आणि त्याच्या आयुष्यात नियतीने काळाकुट्ट अंधार आणला. या आजारात तो पूर्णपणे अपंग बनला. त्याचे हात-पाय पूर्णतः वाकडे झाल्याने तो पूर्णतः दिव्यांग बनला. त्यातच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो लहान असताना त्याची व त्याच्या आईची साथ वडिलांनी सोडली. तो जसजसा मोठा होवू लागला तसा त्याला त्याच्या अपंगत्वाची जाणीव होवू लागली. तरी देखील त्याने शिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्याने रत्नागिरीतील मेस्त्री हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने तेथे घेतले. त्याचे दोन्ही हात निकामी झाल्याने त्याने पायाने लिहिण्याची कला आत्मसात केली. आणि दहावी परिक्षेत वरच्या नंबरात येवून यश संपादन केले. जो हंजला स्वतःच्या हाताने खाऊ पिऊ शकत नाही, ज्याला सरळ बोलता येत नाही अशा हंजलाने दहावीनंतर देखील पुढे शिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्याची घरची परिस्थिती देखील हलाखिची होती. त्याची आई घरकाम करून हंजला शिक्षण देत होती. हंजला याने त्यानंतर गोगटे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी त्याने बी.ए.चे शिक्षण पूर्ण करून प्रथम वर्गात उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. पुढे त्याने एम.ए.चीही परिक्षा गोगटे जोगळेकर कॉलेजमधून दिली. त्यानंतर दुसर्या वर्षीसाठी त्याने चिपळूण डी.बी.जे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गेली दोन वर्षे तो संगमेश्वर ते चिपळूण स्थानक असा बसने प्रवास करून आपले शिक्षण चिकाटीने सुरू ठेवले आहे. हंजला स्वतःच्या हाताने जेवण करता येत नसल्याने सकाळी निघताना त्याची आई त्याला जेवण भरवते त्यावर तो दिवसभर राहतो आणि सायंकाळी परत घरी पोहोचल्यावर त्याची आई त्याला परत जेवण भरवते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत हंजला हा अभ्यास करीत असतो. अपंगत्व व दिव्यांगत्व देऊन नियतीने हंजला याच्यावर अन्याय केला असला तरी जिद्दीच्या जोरावर नियतीशी दोनहात करून विपरित परिस्थिती बदलण्याचे धाडस दाखविणार्या हंजला याला सलामच करावा लागेल.
www.konkantoday.com