
रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदारांना फळ विमा परताव्याची प्रतीक्षा
फळपिक विमा योजनेचा कालावधी संपून दोन महिने लोटले तरीही विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे.विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे; मात्र, अद्याप विमा कंपन्यांकडून परतावाच जाहीर केला नसल्याची बाब पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपिक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूपिकाचा समावेश फळपिक विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील ३० हजार ६८ आंबा बागायतदार तर ६ हजार ८४१ काजू बागायतदार विमा योजनेत सहभागी झाले आहेत.




