पालिकेने खंडित केलेला विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश
रत्नागिरी शहरातील नव्या भाजीमार्केटच्या धोकादायक इमारतीबाबत गाळेधारकांनी न्यायालयाला हमीपत्र दिले आहे. संभाव्य कोणतीही हानी झाल्यास किंवा नुकसानीची जबाबदारी आमची असेल, असे गाळेधारकांनी सुनावणीवेळी हमीपत्र दिले आहे. त्यामुळे पालिकेने खंडित केलेला विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. धोकादायक या इमारतीबाबत लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे पालिका मालमत्ता विभागाने सांगितले.मुसळधार पावसामुळे इमारतीला धोका असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या इमारतीचा वीजपुरवठा महावितरणकडून गेल्या महिन्यात खंडित करून घेतला. हा वीजपुरवठा सुरू व्हावा यासाठी पुन्हा गाळेधारकांनी २५ जुलैला न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. भाजीमार्केट इमारत फारच धोकादायक झाली आहे. सर्व बाजूने पाणी गळत असल्याने शॉर्टसर्किट किंवा विजेच्या झटक्याने दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळेच वीजपुरवठा खंडित केला असल्याचे पालिकेने बाजू मांडली. जीवित किंवा वित्तहानीसंदर्भात गाळेधारकांकडून हमीपत्र मिळाल्यास पालिकेची काहीही हरकत नसल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले.गाळेधारकांकडून त्याप्रमाणे हमीपत्र देण्यात आले. या हमीपत्रानुसार संभाव्य हानी किंवा नुकसानीची जबाबदारी गाळेधारकांनी सुनावणीवेळी घेतली होती. ११ जुलैला वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणी नुकताच आदेश दिला आहे. या आदेशानुसार नवीन भाजीमार्केट इमारतीतील वीजपुरवठा पूर्ववत करून द्यायचा आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात गाळेधारक आणि रत्नागिरी पालिकेने केलेल्या पूर्ततेचा अहवाल देण्याचेही आदेशात म्हटले आहे.