
ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी दुकान मालकाची नजर चुकवून पावणेदोन लाखांची केली चोरी.
आरवली येथील दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी दुकानमालकाची नजर चुकवून काउंटरवर असलेली १ लाख ८६ हजार रुपयांची बॅग चोरली. संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या काही तासात या दोघांच्या मुसक्या आवळत चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे श्रीकृष्ण उद्धव पाटणकर यांचे किराणा मालाचे दुकान असून, ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी विष्णू शांताराम गुरव उर्फ नारू गुरव (३५, रा. खेरशेत गुरववाडी, ता. संगमेश्वर) व आशिष जाधव (३८, रा. खेरशेत जाधववाडी, ता. चिपळूण) हे दोघे दुकानात गेले. यावेळी विष्णू गुरव यांनी दुकान चालक श्रीकृष्ण पाटणकर यांच्याकडे तंबाखू पुडी मागितली.
पाटणकर यांनी पुडी देऊन ते दुकानातील वीज बंद करण्यासाठी आत गेले असता संधी साधून या दोघांनी दुकानातील काऊंटरवरील १ लाख ८६ हजार रुपयांची बॅग लंपास केली. पाटणकर यांच्या पैसे असलेली बॅग दोघांनी पळवल्याचे लक्षात येताच त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे पो. हे. कॉ. सचिन कामेरकर, पो. हे. कॉ. विनय मनवल, पो. हे. कॉ. सासवे, पो. कॉ. अनिल मस्कर यांनी तत्काळ तपास सुरु करून मोठ्या शिताफिने त्या आरोपीपर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेतले आणि चोरी केलेली रोख रक्कम असलेली पैशांची बॅग ही जप्त केली.www.konkantoday.com