
गेल्यावर्षी घडलेल्या बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोट भरून फसवणूक करणाऱ्या आरोपीला आता अटक
बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोट भरून फसवणूक केल्याप्रकरणी सुरेंद्र उर्फ सुर्या रामचंद्र ठाकूर (रा. पलूस, सांगली) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या प्रकरणात कुडाळ तालुक्यातील दोन आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ही घटना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११. ५० वा घडली होती. यातील सुरेंद्र उर्फ सुर्या रामचंद्र ठाकूर याने बनावट नोटांचा वापर करून त्या कुडाळ शहरातील बँक ऑफ इंडियाच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये भरल्या. ३ हजार २०० रूपयांच्या या नोटा असून यामध्ये १०० च्या ९ नोटा, २०० रू च्या ९ नोटा व ५०० रू. ची एक नोट, अशा ३ हजार २०० च्या १९ बनावट नोटांचा समावेश आहे.पोलिसांनी याचा शोध घेतल्यानंतर यातील एक आरोपी हा सुरेंद्र उर्फ सुर्या रामचंद्र ठाकूर हा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील नोटा बनविण्यासाठी वापरलेली मशीन, कागद, शाई याबाबत पोलिसांना शोध घ्यायचा आहे. तसेच यात मोठे रॅकेट आहे का ? याचाही पोलिसांना तपास करायचा आहे