गुहागर येथील उमराठ येथे प्रशांत कदम यांच्या घराजवळ बिबट्याचे पिल्लू आढळले
गुहागर येथील उमराठ येथे शनिवारी बौद्धवाडीतील प्रशांत कदम यांच्या घराजवळ जंगलमय आडीतून आलेले बिबट्याचे पिल्लू आढळले. १५ दिवसांच्या आतील छोटेसे बिबट्या वाघाचे पिल्लू ओरडत असताना प्रशांत कदम यांना दिसले.रविवारी (दि.४)गुहागर वनविभाग अधिकारी यांना प्रशांत कदम आणि उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार सोमवारी (दि.५) वनविभाग अधिकारी येऊन त्या पिल्लाला घेऊन गेले. परंतु ते पिल्लू छोटे असल्यामुळे त्याची देखभाल करण्यासाठी अडचणी येत होत्या. वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन त्या बछड्याला वाघीण पुन्हा घेऊन जाईल अशा हिशेबाने मंगळवारी संध्याकाळी पुन्हा वनविभाग अधिकाऱ्यांची टिम त्या बछड्याला घेऊन घटनास्थळी आले. यानंतर त्याला वनविभागाने मुंबई बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) येथे रवानगी करण्यात आली.