
रेल्वे तिकिट आरक्षणात काळा बाजार करणार्यांवर कारवाई करा
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणार्या चाकरमान्यांना तिकिटे उपलब्ध करून देण्याबरोबरच तिकिट आरक्षणात काळाबाजार करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणार्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकींग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात बुकींग फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासिय चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच खासगी बसचालकाकडून गणपती उत्सवाच्या काळात २ ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात आहे. ही अक्षरशः लूटमार आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेवून मुंबईतून कोकणात येणार्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, खासगी वाहनाच्या दरांवर नियंत्रण आणावे व तिकिटाचा काळाबाजार करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी विनंती जाधव यांनी केली आहे. www.konkantoday.com