
खेड येथे वटपौर्णिमेमित्त वडाच्या रोपांचे वाटप
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने आवाहन आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खेड येथे असंख्य महिलांनी वडाचे रोप नेऊन त्याची पूजा केली.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा केली जाते. वडाची तोड केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास अडचण येते. तसेच ज्या प्रमाणात तोड केली जाते त्याप्रमाणात त्याची लागवड मात्र केली जात नाही. हा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने फांदी न मोडता वडाच्या रोपाची पूजा करा आणि ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावा, असे आवाहन करण्यात आले होते. याच अनुषंगाने माजी नगराध्यक्षा आणि महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या खेड तालुकाध्यक्ष सौ. पुनम शेट्ये-पाटणे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने खेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल (९ जून) सायंकाळी वडाच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी खेड शहरातील असंख्य महिलांनी हे रोप नेऊन याचीच पूजा करणार असल्याचे सांगितले. यावेळी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे खेड शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे, भालचंद्र (नंदू) साळवी, मिलिंद (दादू) नांदगावकर, प्रदीप भोसले, प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा सौ. पुनम शेट्ये-पाटणे , सौ. अक्षता दांडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.