मतदार यादी दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 10, 11, 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी शिबिरे
*रत्नागिरी, दि. 10 (जिमाका) : मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 10 ऑगस्ट (शनिवार), 11 ऑगस्ट (रविवार) व 17 ऑगस्ट (शनिवार), 18 ऑगस्ट (रविवार) या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मतदार यादीच्या शुध्दीकरणासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सन 2024 मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या निवडणूकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नव मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.* भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावार आधारित मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि.10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट व दि. 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केलेली आहेत. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रांवर सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे या चार दिवस उपस्थित राहून नागरिकांचे मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीचे अर्ज भरुन घेणार आहेत. तरी या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दिनांक 06 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती व वगळणीचे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयात दाखल करता येतील.