
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध क्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आपले विविध पुरस्कार जाहिर केले आहेत. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड संघातर्फे केली जाते. यासाठी कोणतेही प्रस्ताव मागवण्यात येत नाहीत. हे पुरस्कार संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी जाहिर केले. श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.उद्योजिका पुरस्कार सौ. सई सुरेंद्र ठाकुरदेसाई यांना जाहिर झाला. त्या सुरवातीला विविध शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 2015 पासून त्यांनी फळप्रक्रिया व्यवसायाला प्रारंभ केला. सई कोकण उत्पादने या नावाने त्या 22 पेक्षा अधिक उत्पादने निर्मिती करत असून त्यांच्याकडे 10 महिलांना 240 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पुणे, मुंबई, सांगलीसह परदेशातही ही उत्पादने विक्री करतात. २०२१ पासून पारंपरिक पदार्थांनी युक्त कोकणी जेवण पर्यटकांसाठी उपलब्ध करून देत असून आतापर्यंत ४००० हून अधिक पर्यटकांनी याचा आस्वाद घेतला आहे. त्या कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हलंट फाउंडेशन, सॅटर्डे क्लबमध्ये कार्यरत आहेत.उद्योजक पुरस्कार वरद खांडेकर (बुरंबाड, संगमेश्वर) यांना जाहिर झाला असून काजू प्रक्रिया उद्योजक आहेत. तसेच कुळीथ पीठ, डांगर, मेतकूट, भाजणी, गोडा मसाला, आमसुले, आवळा पेठा आदी कोकणी प्रॉडक्ट्स ते बनवतात. ते ही सर्व उत्पादने भरूच, गुजरात, बीड, पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवतात.दर्पण पुरस्कार अनिकेत कोनकर यांना जाहिर झाला आहे. ते आकाशवाणी रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. ते बीएस्सी अॅग्रिकल्चर आणि मास्टर ऑफ जर्नालिझम पदवीप्राप्त आहेत. २००८ पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सकाळ अॅग्रोवन, महाराष्ट्र टाईम्समध्ये उपसंपादक, पुणे आकाशवाणीत हंगामी वृत्त निवेदक म्हणून काम केले आहे. २०१७ पासून ते डिजिटल जर्नालिझममध्ये कार्यरत आहेत. काही काळ बाईट्स ऑफ इंडियाचे संपादकही होते. काही पुस्तकांचे संकलन, संपादन केले आहे. ‘स्टोरीटेलर्स’ या कंपनीत मुख्य उपसंपादक पदावर कार्यरत असून यापूर्वी त्यांना २०१८ साली महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे सोशल मीडिया विभागाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे.आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. श्रीकृष्ण पाध्ये (लांजा) यांना जाहिर झाला आहे. ते वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर रत्नागिरीत पिग्मी प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यावेळी वेदशाळेतील वेदमूर्ती घनपाठी विनायक भट्ट आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली याज्ञिक शिक्षणाला सुरवात केली. प्राथमिक प्रगती पाहून गुरुजींना त्यांना संपूर्ण याज्ञिक शिक्षण घेण्याचा आग्रह केला. तेव्हा काही काळ पिग्मी गोळा करताना सायकलवर पोथी ठेवून संथा म्हटल्या व अभ्यास केला. 1993 पासून गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत 2018 पर्यंत व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.धन्वंतरी पुरस्कार डॉ. सौ. छाया जोशी (राजापूर) यांना दिला जाणार असून त्या गेल्या 36 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. राजापूर येथे जोशी हॉस्पीटलमध्ये त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण भोपाळ, मध्यप्रदेश येथे झाले आहे. यापूर्वी त्यांनी भोपाळ आणि पारसी जनरल हॉस्पीटल येथे वैद्यकीय अधिकारी, मुंबईत हरकिशनदास हॉस्पीटलमध्ये ब्लड बॅंक ऑफिसर, छाया हॉस्पीटल अंबरनाथ येथे स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून सेवा दिलेली आहे.आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. रोहन भालचंद्र पुराणिक (वेंगुर्ला) यांना जाहिर झाला आहे. त्यांचे याज्ञिकीचे शिक्षण वे. मु. मुरवणे गुरुजी यांच्याकडे झाले असून कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण ह. भ. प. भास्कर तथा राजु मुंडले यांच्याकडे झाले. महाराष्ट्रासह कारवार, अहमदाबाद, गोव्यातही कीर्तने केली आहेत. तसेच संगीत शारदा, सं. जय जय गौरीशंकर या नाटकातही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. रुचा राकेश हर्डीकर (आडिवरे) यांना दिला जाणार आहे. त्या आडिवरे येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूलमध्ये गणित, विज्ञान शिक्षिका आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये त्या सहभागी होतात. शिष्यवृत्तीसह अनेक शालाबाह्य परीक्षांसाठी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. क्रीडा महोत्सवातही त्या सक्रिय सहभागी असतात.राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार रत्नागिरीची राष्ट्रीय खो-खो खेळाडू कु. आर्या मदन डोर्लेकर (रत्नागिरी) हिला देण्यात येणार आहे. ती सध्या रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. ती दोन वेळा छत्तीसगड व जयपूर येथे राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळली आहे. महाराष्ट्र संघ, खेलो इंडिया महिला संघात दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. तसेच नागपूर येथे भाई नेरूरकर चषक, जळगाव येथे महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धा, रत्नागिरी, नंदुरबार येथे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तिला प्रशिक्षक पंकज चवंडे व क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.कृषिसंजीवन पुरस्कार प्रसाद पुरुषोत्तम पाध्ये (पाथर्डी, चिपळूण) यांना देण्यात येणार आहे. सन 2024 पासून मनोहर वासुदेव डिंगणकर यांनी दिलेल्या कायम ठेवीतून हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्हाडे ज्ञातीतील शेतकऱ्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पाध्ये यांनी टाटा मोटर्स येथे तांत्रिक शिक्षण घेऊन नोकरी केली. नोकरी सोडल्यानंतर 2000 सालापासून ते शेतीत रमले. त्यांनी सहा एकरात काजू, आंबा, नारळ, सुपारी अशी झाडे वाढवली आहेत. भातशेती, भाजीपाला, केळीपिके घेतात. सन २०२२ च्या उन्हाळ्यात त्यांनी वडिल, मुलगा यांच्या मदतीने ५ फूट गोल व २५ फूट खोल विहीर खोदली आहे.पहिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार रुद्रांश उमेश लोवलेकर याला जाहिर झाला आहे. त्याचे तायक्वांदोचे ब्लॅकबेल्टपर्यंत शिक्षण झाले आहे. सूर्यनमस्काराच्या स्पर्धेत राज्यस्तरीय बक्षीसे मिळवली आहेत. आर. बी. सप्रे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही त्याने यश मिळवले आहे. त्याने आठवीत शिष्यवृत्ती व दहावीमध्ये कोणत्याही क्लासला न जाता 99.20 टक्के गुण मिळवले. बारावीमध्ये त्याने 97 टक्के मिळवून यश मिळवले. तो तबला विशारद असून सध्या तो पुण्यात आर्टिकलशिप करत असून सीए फायनल परीक्षेचा अभ्यास करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून असंख्य पुस्तके त्याने वाचली असून इतिहासातील अनेक प्रसंग, राजकारण व त्यामागचे हेतू अनेक गोष्टी तो मित्रांना सांगत असतो. सन 2024 पासून दर तीन वर्षांनी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नचिकेत मोघे यांनी संघाकडे ठेव ठेवली आहे. हा पुरस्कार गुणवत्ता पारितोषिक कार्यक्रमात देण्यात येईल.