
मालगुंड मराठवाडी येथील धरणात बुडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथील धरणामध्ये बुडून एका तरुणाची मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. कु पार्थ राजेंद्र राणे (वय वर्षे 17 रा. मालगुंड) असे त्याचे नाव आहे. पार्थ हा इयत्ता बारावी सायन्स मध्ये रत्नागिरी येथे फाटक महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. गुरूवारी मालगुंड येथे आल्यानंतर तो आपल्या चार मित्रांसोबत पोहण्या साठी मालगुंड मराठवाडी येथील धरणात गेला होता. यावेळी पार्थ व त्याचे मित्र धरणाच्या पाण्यात पोहत असताना पार्थ याला अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याचे लक्षात आले. पार्थ ला चक्कर आल्याने तो बुडू लागला, त्याला वाचवण्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर ताबडतोब त्याच्या मित्रांनी व आजूबाजूला असलेल्या इतर तरूणांनी त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. त्याला बेशुद्धावस्थेत आणल्यानंतर त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. पार्थ त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका मुलगा होता. तसेच अत्यंत गुणी आणि हुशार असा मुलगा असल्याची माहिती अनेकांकडून सांगण्यात आली. त्याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण मालगुंड गावातून हळहळ व्यक्त होत असून गावांत शोककळा पसरली आहे .