जिल्ह्यात हॉटेल्स, लॉज, धर्मशाळांना मिळणार मानांकन
भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोठा हिस्सा असून पर्यावरण रक्षणार्थ हागणदारीमुक्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय सुविधांची उपलब्धी पर्यटकांना प्रभावीत करणार्या असतात. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना सुविधा पुरविणार्या हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा, होमस्टेज, कॅम्पसमधून स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता ग्रीन लीफ रेटींग ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित आस्थापनांना मानांकन देण्यात येणार आहे.पेयजल मंत्रालय तसेच पर्यटन मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील ग्रामीण, शहरी भागातील पर्यटक अनुकूल स्वच्छता सुविधांचे मूल्यमापन करणे (ग्रीन लीफ रेटींग इन हॉस्पिलिटी फॅसिलिटीज) प्रस्तावित आहे. त्यामुळे सेवा क्षेत्रातील स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मूल्यांकनामुळे अशा व्यावसायिक आस्थापनांमध्ये विधायक स्पर्धेचे वातावरण निर्माण होवून त्याचा पर्यटनवृद्धीत उपयोग होवून देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावण्यास मदत होणार आहे. मानांकन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिवपदी प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा समन्वयक स्वच्छ भारत मिशन, सदस्यपदी पर्यटन विभाग/ एमटीडीसी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने पर्यटन/हॉटेल उद्योगातील प्रतिनिधींचा यामध्ये समावेश असणार आहे. www.konkantoday.com