मंदिर पेटवलं, मूर्तींची तोडफोड; हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशमध्ये हिंदू मंदिर लक्ष
बांगलादेशच्या शेख हसीना परागंदा झाल्या आहेत. त्यांनी भारतात आश्रय घेतल्याचं सांगितलं जातं. हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये उत्पात सुरु झाला आहे. बांगलादेश हा मुस्लीम बहुल देश आहे.त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या हिंदूंच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच, आंदोलकांमधील कट्टर लोकांकडून हिंदू मंदिर लक्ष केलं जात आहे.बांगलादेशच्या खुलना भागातील मेहरपूरमधील इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. याठिकाणी मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, मंदिराला आग लावण्यात आली आहे. दोघांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.मेहरपूरमधील हिंदू मंदिरात आग लावण्यात आली, त्यानंतर भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांच्या मूर्ती फोडण्यात आल्या. मंदिरातील पुजाऱ्यांनी कसंतरी आपला जीव वाचवला आहे. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर देशात कट्टरतावादी कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे देशात हिंदू धोक्यात आले आहेत.इस्कॉनचे कृष्णादास यांनी सांगितलं की, २९ जिल्ह्यांमधील हिंदू मंदिरांना आणि हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. ढाकामधील इस्कॉन मंदिरावर देखील हल्ला करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये जेव्हा परिस्थिती अस्थिर होते, तेव्हा त्यांचे पहिले लक्ष हिंदू मंदिर असतात. सध्या हिंदू लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते घराला आतून कुलूप लावून राहात आहेत. त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.कृष्णादास म्हणालेत की, परिस्थिती कशी जरी असली तरी आम्ही भगवान कृष्णाला सोडणार नाही. आमचे प्राण गेले तरी चालतील. बांगलादेशमध्येच आमचा जन्म झाला आहे, त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. हिंदू मंदिरावरील हल्ले धोकादायक विषय आहे. चटगांवमध्ये तीन हिंदू मंदिर संवेदनशील भागात आहेत. मंदिरांना वाचवण्यासाठी पोलिसांची मदत मागण्यात आली आहे. पण, जवानांवर देखील पळून जाण्याची वेळ येत आहे.