भारत जोडो अभियानच्या पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी जिल्हास्तरिय समन्वय समिती स्थापन

_गतवेळचा अनुभव लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत आपण अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची गरज आहे.त्यासाठी अभियानाने जनतेचा ‘जाहीरनामा’ नव्हे तर ‘आग्रहनामा’ तयार केला आहे. ‘स्वाभिमानी, समतावादी, समृद्ध, सुसंस्कृत आणि सर्वांसाठी महाराष्ट्र’, असे या आग्रहनाम्याचे घोषवाक्य आहे. संपूर्ण संविधान आणि खरी लोकशाही अंमलात यावी असे या आग्रहनाम्याचे अंतिम लक्ष्य आहे, असे प्रतिपादन भारत जोडोच्या महाराष्ट्र समन्वयक उल्का महाजन यांनी चिपळुणातील बैठकीत केले. भारत जोडो अभियानची रत्नागिरी जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक नुकतीच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात झाली. अभियानाचे तालुकाध्यक्ष राजन इंदुलकर यांनी बैठकीची रूपरेषा मांडली. भारत जोडोने महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन विविध आघाड्यांवर काम केले. राज्यभर अनेक ठिकाणी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. हे जरी खरे असले तरी आघाडीच्या घटक पक्षांनी एकजुटीने अधिक जोमाने काम केले असते तरअधिक जास्त फरक पडला असता, असा सूर निघाला. उल्का महाजन यांनी राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. भारत जोडो अभियानाने लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत हा आग्रहनामा समोर धरून प्रभावीपणे काम करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. भारत जोडो अभियानच्या पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी जिल्हास्तरिय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत निखिल भोसले, युयुत्सू आर्ते, विलास कोळपे, माधव शेट्ये, सचिन तोडणकर, पंकज दळवी, सुदेश हडकर, राजेश समेळ, गणेश बिलार यांची निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button