उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर

मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून (मंगळवार) ३ दिवस दिल्ली दौ-यावर आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी ते या दौऱ्यात घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या या भेटीमध्ये आगामी राजकीय रणनितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.विधासभेची आगामी निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभेत चांगली कामगिरी केल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकाही शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस आदी घटक पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहेत. सर्वाधिक जागा लढविण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे आग्रही आहेत; परंतु काँग्रेस आणि ठाकरेंनी प्रत्येकी १०० जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव शरद पवार यांनी ठेवत, आघाडीत समन्वय राखण्याचे प्रयत्न आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ६, ७ आणि ८ ऑगस्ट असे ३ दिवस ते दिल्ली दौ-यावर जात आहेत. त्यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे असणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौरा करणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या दौ-यात अनेक भेटीगाठी होतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या भेटी होतील. दिल्लीत अधिवेशन सुरू असल्याने इंडिया आघाडीतील आप, समाजवादी पक्ष यांच्यासह प्रमुख नेत्यांबरोबरच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीही भेट होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button