“राज ठाकरेंवर टाडा लावून त्याला कारागृहात टाकले पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संताप!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचा आरोप केला. यावरून वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर संताप व्यक्त केला. तसेच त्यांच्यावर टाडा लावून सरकारने त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असे विधान अमरावतीत माध्यमांशी बोलताना केले.*प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?*“महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश, गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागला पाहिजे. अशा व्यक्तींना टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळे झाले पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. *काय म्हणाले होते राज ठाकरे?*“आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होतो. ठाणे जिल्हा हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. ही लोकसंख्या बाहेरच्या लोकांनी वाढवली. आपला पैसा त्यांची व्यवस्था करण्यातच जातो, आपल्या नोकऱ्याच्या जाहिराती युपी बिहारमध्ये येतात, मग आपल्या तरुणांना हे कळत नाही?” असा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी परप्रातीयांवर भाष्य केले होते. यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.