अचूक हवामान अंदाजासाठी रत्नागिरी जिल्ह्यात अत्याधुनिक रडारची उभारणी करण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी शेतकरी फवारणी करतात व त्यानंतर पाऊस पडला की, फवारणीचे लाखो रुपये वाया जातात. त्यामुळे अचूक हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक रडारची उभारणी आवश्यक आहे. काजू प्रक्रिया युनिट आणि आंबा बागायतदारांची पीककर्ज व्याजमाफीची मागणी आहे तसेच देवगड व पालघर येथे मत्स्य महाविद्यालयाची आवश्यकता असल्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली.शनिवारी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात भाजप महाअधिवेशन झाले. त्या वेळी जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले की, दक्षिण रत्नागिरीत भाजपच्या बूथ कमिटी फक्त कागदावर नाहीत, चर्चा करून केलेल्या आहेत. लोकांपर्यंत बूथप्रमुख पोहोचतआहे. आगामी सर्व निवडणुका, पक्षाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. रत्नागिरीत काजू प्रक्रिया उद्योग करणारी एमआयडीसी निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. मत्स्य विभागाकडून देवगडमध्ये मत्स्य विद्यालय व्हावे, असा एका संस्थेचा प्रस्ताव पुण्यात पाठवलेला आहे. पालघरमध्येही असे कॉलेज व्हावे, अशीमागणी आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र रिसर्च कौन्सिल ऑफ दी अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट येथे प्रस्ताव आहे, तो शासनाने मागवून घेऊन दोन्ही महाविद्यालयांना परवानगी मिळावी. पर्यायाने मत्स्य अधिकारी संख्या वाढेल. पर्ससिननेट मच्छीमारीला ३१ डिसेंबरपर्यंत परवानगी असते. पूर्वी ती ३१ मेपर्यंत होती. ती तशी वाढवून मिळण्याची मागणीही सावंत यांनी केली