मुंबई गोवा हायवे वरून शिंदे सेना व भाजपमध्ये राजकारण तापू लागले
गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून राजकारण तापू लागले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी करणारे पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले.कदम यांनी पत्र देत भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना डिवचल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत उघड नाराजी व्यक्त केली. कदम यांनी अशा प्रकारे महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असे सुनावतानाच हिमंत असेल तर समोर येऊन बोला असे खुजल्या आणणारे राजकारण करत महायुतीतील वातावरण बिघडवू नका असे खडे बोल सुनावले. सुरुवात तुम्ही केलीत तर शेवट आम्ही करणार, आम्ही सोडणार नाही असा गंभीर इशारा दिला आहे. तर राजेश कदम यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देताना आपण चाकरमानी म्हणून आपल्या नेत्याकडे व्यथा मांडल्या. त्यांना जसे आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच आम्हाला देखील आहे. आम्ही कोणाला दुखावण्यासाठी हे केलेले नसल्याचे सांगताना शशिकांत कांबळे यांनी गणेशोत्सव काळात या रस्त्यावरून प्रवास करावा म्हणजे त्यांना आमच्याव्यथा कळतील, अशा शब्दात सुनावले आहे. दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसल्याने आता कल्याण पूर्वे नंतर डोंबिवलीत देखील शिवसेना – भाजपातील वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.