भोंगळ कारभाराचा फटका,शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश नाही

शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी शाळेचा गणवेश व्यवस्थित असावा, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते; मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 70 हजार 552 मुला-मुलींना जुनाच गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ येणार आहे. विशेष म्हणजे एका गणवेशासाठी शासनाकडून आलेले कापड अजूनही तालुक्यालाच पडलेले असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पाठ्यपुस्तकांप्रमाणेच गणवेशही मिळणार होते; परंतु शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. राज्य सरकारकडून गणवेश मिळेल, किमान स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळेल, या आशेवर विद्यार्थी-पालक आहेत.राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे इयत्तानिहाय स्वरूप निश्चित केले आहे. त्यानुसार पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवार कमीज ओढणी असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे; तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश दिला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button