
पुणे- हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणार्या तिघा दरोडेखोर आंबोलीत सिनेमा स्टाईल जेरबंद
पुणे- हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणार्या तिघा दरोडेखोरांना आंबोलीत सिनेमा स्टाईल जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी दरोडेखोरांची कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला, तरीही पोलिसांनी जीवावर उदार होत या दरोडेखोरांना जेरबंद केले.त्यांच्याकडून दोन बंदुकांसह जिवंत काडतुसे व सोन्या-चांदीचा ऐवज जप्त केला आहे.या संशयितांना सावंतवाडीत आणण्यात आले असून जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पिंपरी-हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील सराफी दुकानावर पाच चोरट्यांनी भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करत मिळतील ते दागिने घेऊन या दरोडेखोरांनी पोबारा केला होता. पिंपरी- चिंचवड तसेच हिंजवडी पोलिस आरोपीचा पाठलाग करत होते. दरम्यान, या दरोडेखोरांनी गोवा गाठण्याचे ठरवले त्याप्रमाणे शनिवारी ते कारने गोव्याकडे जात होते. शनिवारी दुपारी आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर त्यांची कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. यावेळी दरोडेखोरांनी कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, आबा पिळणकर, दीपक शिंदे, अभिजीत कांबळे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवावर उदार होत या दरोडेखोरांना कारसह जागेवर अडवून धरत त्यांना पकडले.