रोणापाल जंगलात सापडलेली अमेरिकन महिला मानसिक उपचार करण्यासाठी रत्नागिरीत
सावंतवाडी जवळील रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेवर मानसिक उपचार करण्यासाठी रत्नागिरी येथे गुरुवारी रात्री उशिरा हलविण्यात आले. महिलेच्या आधारकार्डवर असलेला पत्ता चुकीचा असल्याने प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.आठ दिवस उलटूनही महिलेचा पती अद्यापही पोलीस पथकाच्या हाती लागला नाही. दरम्यान, अमेरिकेतील प्रसारमाध्यम व समाज माध्यमावर यासंदर्भात बातम्या व व्हिडीओ सातत्याने प्रसारित होत आहेत. अमेरिकन सरकारवर देखील यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी दबाव वाढत आहे. अमेरिकेत सर्वत्र ‘धीस वुमन इज ए वॉरीअर्स’ या हॅशटॅग खाली तिचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.जंगलात सापडलेल्या त्या महिलेवर गेल्या दहा वर्षात भारतातील गोवा, मुंबई व दिल्ली येथे मानसिक उपचार झाले आहेत. त्यापूर्वी देखील तिच्यावर अमेरिकेतील फिलिपीन्स राज्यात मानसिक आजारावर उपचार झाले आहेत. सदरची महिला ही पर्यटक व्हिसावर भारतात आली होती. त्यानंतर तिच्या पारपत्राची मुदत संपली होती. अमेरिकन दुतावासाने तिच्या पारपत्राची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज स्वीकारला आहे. मात्र, ती माहिती देत असलेला तिचा पती सतीश याच्याशी तिची कशी ओळख झाली. तसेच ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जंगलात कशी पोचली हे गूढ मात्र अद्यापही कायम आहे.