रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील गरोदर मातेचा उपचारादरम्यान बाळासह मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील गरोदर महिलेचा उपचारादरम्यान बाळासह मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तेजश्री शशिकांत माचिवले (२५, रा. तरवळ माचिवलेवाडी) असे या महिलेचे नाव आहे. अचानक तेजश्रीला उलट्या होवून अत्यवस्थ वाटू लागल्याने तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी जन्म दिलेल्या बाळासह तेजश्री हिचा मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजश्री ही ९ महिन्यांची गरोदर होती. तेजश्री हिला अचानक उलट्यांचा त्रास होवून अत्यवस्थ वाटू लागले होते. यावेळी नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. येथे तेजश्रीच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी तेजश्रीला कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल केले. कोल्हापूर येथे तेजश्रीचे सिझेरियन करण्यात आले. यावेळी तेजश्री हिने मृत बाळाला जन्म दिला तसेच तेजश्री हिच्यावर उपचार सुरु असताना २१ जुलै २०२४ रोजी रात्री ११ च्या सुमारास तेजश्री हिचा मृत्यू झाला.www.konkantoday.com