
अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्राथमिक शाळेतील पालकांमध्ये नाराजी
आज पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये नव्या उत्साहात पालकांनी, ग्रामस्थांनी आपल्या मुलांचे नवीन इयत्तेमध्ये त्याचबरोबर पहिलीला दाखल होणाऱ्या नवगतांचे स्वागत करत आहेत. परंतु पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर पालकांच्या लक्षात आले की,आपल्या शाळेमध्ये रोस्टर प्रमाणे शिक्षक उपलब्ध नाहीत.त्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या इयत्तेच्या शाळेत दोन शिक्षक उपलब्ध करून देणे त्याचबरोबर सातवीपर्यंतच्या शाळेत चार शिक्षक रोस्टर प्रमाणे उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु शाळेमध्ये शिक्षक कमी असल्याकारणामुळे शाळा फक्त रोज उघडली जाईल परंतु मुलांना जे शिक्षण मिळाले पाहिजे हे मिळाले याची खात्री पालकांना नाही. शाळा उघडण्या इतपत शिक्षक उपलब्ध असल्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
यावर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत आहे परंतु शाळेमध्ये आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे या शैक्षणिक धोरणाचे होणार काय? हे प्रश्नचिन्ह आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा असून या मुलांना मोफत शिक्षण शासनामार्फत मिळते परंतु जर त्या मुलांना शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध नसतील तर या मुलांना खरोखर जे गरजेचे शिक्षण आहे ते मिळणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद च्या शाळांमधील अनेक पदे रिक्त असून वारंवार होणारी जिल्हा बदली निवृत्त शिक्षकांची संख्या यामुळे या जिल्ह्यातील 1000 पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्व शाळांना शिक्षक पुरवणे शक्य जिल्हा परिषदला झालेले नाही. या शासनाच्या धोरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील बहुतांशाळांमध्ये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कोकणातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी मुलांच्या शिक्षणाचे काय होणार? याकडे गांभीर्याने पाहताना शासन दिसत नाही अनेक शाळांचा पट कमी झाल्याचे कारणे वारंवार होणारी जिल्हा बदली हेच असून जिल्ह्यातील स्थानिक मुलांना कोणत्याही क्षेत्रात या ठिकाणी नोकरी उपलब्ध होत नसल्या कारणामुळे वारंवार स्थलांतर होत आहे आणि या स्थलांतरामुळे इथल्या शाळा बंद पडत आहेत बऱ्याच शाळांची पटसंख्या कमी झाली असून या शाळेमध्ये एक किंवा दोन शिक्षक देऊन शाळा उघडण्याचे काम शासन करत आहे परंतु या शिक्षकांना शाळाबाह्य काम आणि इतर प्रशासकीय कामकाजामुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वेळ देता येत नसल्याचे दिसून येत आहे.आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि असलेल्या शिक्षकांवर इतर कामांचं ओझं त्यामुळे मुलांची शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षक संख्या कमी झाल्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे जर शासनाने याच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये शासनाने कंत्राटी तत्त्वावरती पहिला वर्षी 672 शिक्षक तर दुसऱ्या वर्षी 495 शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली होती. परंतु या सर्व स्थानिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केल्यामुळे हे शिक्षक शाळेत उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे याचा परिणाम देखील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणार आहे रिक्त पदांचा तात्काळ भरणा करून सर्व जिल्ह्यातील शाळांना शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होत आहे.