
‘कुवारबाव ज्येष्ठ नागरिक’ वाचनालयाला कपाटे, दिव्यांग ज्येष्ठांना पुनर्वसन साहित्याची देणगी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिलेल्या देणगीबाबत ज्येष्ठ नागरिक संघाकडून धन्यवाद
रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. उदय सामंत यांनी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाला व्याधीग्रस्त दिव्यांग ज्येष्ठांच्या पुनर्वसनासाठी अत्यावश्यक साहित्य तसेच संघाच्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा वाचनालय कक्षासाठी दोन बुक सेल्फ कपाटे देणगी दाखल दिली आहेत. त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाकडून मंत्री उदय सामंत यांना धन्यवाद देण्यात आले आहेत. दिनांक पाच ऑगस्ट रोजी कुवारबाव गाव भेटीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयासाठी कपाटांची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्या सभेत त्यांनी ही कपाटे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे आपल्या वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध विकलांग ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक पुनर्वसनासाठी दोन बेड, दोन व्हील चेअर्स, दोन कमोड खुर्च्या, दोन वॉकर्स आणि एक वॉटर बेड असे साहित्य यापूर्वीच दिले होते. या साहित्याचे कुवारबाव येथील कार्यक्रमात त्यांनी संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्याकडे साहित्य सुपूर्त केले. तसेच कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाने संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या नावाने वाचन कक्ष सुरू केल्याबद्दल या उपक्रमाचे स्वागत करून संघाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी पालकमंत्री नामदार सामंत यांनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक साहित्य आस्थेने उपलब्ध करून देऊन ज्येष्ठांचा सन्मान केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत.




