
चिपळुणातील वाशिष्टी नदीपात्रात गुरूवारी पुन्हा सोडणार धरणाचे पाणी
चिपळूण : गुरूवारी पुन्हा वाशिष्ठी पात्रात दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सुमारे दीड मीटरने कोळकेवाडी धरणाचे तीनही दरवाजे सकाळी 10 वा. उघडण्यात येणार आहेत आणि वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीचा अभ्यास होणार आहे. मोडक समिती अभ्यासगटाने सूचविल्याप्रमाणे कोळकेवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. कोळकेवाडी धरणामुळे चिपळूणच्या पुराची तीव्रता वाढली असा आरोप झाल्यामुळे शासनाने मोडक समिती अभ्यास गट नेमून तीन महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार या समितीच्या चार बैठका पोफळी येथील महाजनकोच्या कार्यालयात झाल्या. या बैठकीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. आता पुन्हा कोळकेवाडी धरणातून दहा हजार क्युसेक पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठीला सोडण्यात येणार आहे व त्याचाही अभ्यास होणार असून ठिकठिकाणी पाणी पातळी मोजली जाणार आहे. सकाळी 10 वा. भोंगा वाजवून धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील व या कालावधीत नदीकिनार्यावरील लोकांनी नदीमध्ये जाऊ नये. आपली गुरेढोरे नदीमध्ये सोडू नयेत. याबाबत कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाने सूचना दिली आहे.