
‘इग्नाईट’ कार्यशाळेस उद्योजकांचा चांगला प्रतिसाद सर्व योजनांचे रुपांतरण करुन गावात कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करा -मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार रत्नागिरी, दि. 31 (जिमाका) : केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रुपांतरण करुन एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील का, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी लवकरच कार्यशाळा घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणे आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागृता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘इग्नाईट महाराष्ट्रा’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पुजार बोलत होते. यावेळी उद्योग विभागाच्या सहसंचालक विजु शिरसाट, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, मैत्रीचे समन्वय अधिकारी किशोर गिरोल्ला, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑरगनायझेशनच्या रिशु मिश्रा, सीडीबीचे मनोज डिंगरा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, इग्नाईट 2024 सारख्या कार्यशाळेतून उद्योजकांना विविध विभागांची चांगली माहिती मिळणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून बँकर्स, विविध विभागांचे प्रतिनिधी, उद्योजक यांचा या निमित्ताने चांगला संवाद घडून येणार आहे. सीएमईजीपी, पीएमईजीपी सारख्या योजनांचे आपल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम सुरु आहे. जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एमएसईएमई मध्ये आपल्या जिल्ह्यात 52 हजार उद्योग सुरु आहेत. यामाध्यमातून देशाच्या जीडीपीमध्ये त्यांचा मोठा सहभाग ठरत आहे. टुरिस्ट हाऊसबोट सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील महिलांना केरळ येथे अभ्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याचबरोबर 20 महिलांना केरळ येथे काथ्या उद्योगासाठी पाठविण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यामध्ये लवकरच 5 टुरिस्ट बोट सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहसंचालक श्रीमती शिरसाट म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहचाव्यात हा एकमेव उद्देश या इग्नाईट कार्यशाळेचा आहे. या कार्यशाळेमध्ये विविध तज्ञ त्यावर मार्गदर्शन करणार आहेत. उत्पादित झालेल्या मालाला निर्यात करण्यासाठी कोणता देश बाजारपेठ मिळवून देऊ शकतो याची माहिती आज मिळणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट समिट घेतले आहे. कोकण विभागात 416 सामंज्यस्य करार झाले आहे. त्यातील 61 रत्नागिरीसाठी आहे. त्यामाध्यमातून 1400 कोटी गुंतवणूक होऊन 5383 रोजगार निर्मिती होणार आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थी संजीवनी कुरतडकर, करुणा सागवेकर आणि शमिका कुंभवडेकर या प्रातिनिधिक तिघींना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणभर यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रस्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. व्यवस्थापक हरिभाऊ आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.000