आश्चर्यकारक! वारणा कार कोसळून बुडालेला तरुण ६ दिवसांनी रेल्वेत जिवंत सापडला!!

किणी : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वारणा पुलावरून सहा दिवसांपूर्वी नदीपात्रात पडलेल्या कारचा चालक नजीर कांकनडगी याचा अखेर नाट्यमयरित्या शोध लागला. कार नदीत कोसळल्यानंतर बुडालेल्या नजीरचा नदीपात्रात शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. अखेर सहा दिवसांनी मंगळवारी (दि.३०) तो सातारा येथून मिरजेत आलेल्या रेल्वेत मिळून आला. त्याच्यावर इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारणा नदी पूल बुडालेल्या नजीरचा सातारा ते मिरज प्रवास प्रवास कसा झाला याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही.*मूळचा विजापूर येथील व सध्या कुंडलवाडी (ता.वाळवा जि. सांगली) येथे वास्तव्यास असणारा सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर नजीर कांकनडगी गेल्या आठवड्यात बुधवारी (दि.२४) रात्री आपली कार (क्रमांक एमएच १० बीएम-८४२८) घेऊन कोल्हापूरहुन कुंडलवाडीकडे निघाला होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील वारणा नदीपुलाच्या वळणावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वारणा नदीत कोसळली होती. त्यानंतर जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आले. गुरुवारी (दि.२५) सायंकाळी ही कार क्रेनच्या सहाय्याने वर काढण्यात आली, मात्र कारचा चालक नजीरचा मात्र ठावठिकाणा लागला नसल्याने शोधमोहीम सुरू होती. अखेर सहा दिवसांनी आज (मंगळवारी) सकाळी तो सातारा येथून आलेल्या रेल्वेत मिरज येथे सापडल्याची माहिती समोर आली आहे. नजीर याच्यावर इस्लामपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भर महापुरात नदीपात्रात कार कोसळून अपघात झाल्याने जिवंत असण्याची सुतरामही शक्यता नसताना नजीर चक्क जिवंत असल्याचे पाहून त्याच्या कुटूंबियांचा आणि नातेवाईकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. मात्र वारणा नदी पूल ते सातारा व परत मिरज ते इस्लामपूर प्रवास कसा झाला याचे कोडे उलगडायला काही अवधी जाण्याची शक्यता आहे. या सर्व घटनेचा उलगडा तपासांनंतर निष्पन्न होईल, असे वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button