
साहेब, महाराष्ट्रातल्या बहिणींना आता लाडकी बहिण योजनेपेक्षा ‘सुरक्षित बहिण’ योजनेची गरज मनसेचा शिंदेना टोला!
राज्यातील महिला सुरक्षित नसल्यामुळे आता महिलांना लाडक्या बहिणी योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी सोशल मीडिया द्वारे व्यक्त केले आहे. राज्यातील महिलांना लाडक्या बहिणी योजनेची नाही तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत, असे ट्विट करत योगेश चिले यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.मागील काही दिवसांपासून मुलींच्या हत्येच्या घटना घडत आहेत. नवी मुंबई आणि पनवेल उरण परिसरात दोन बहिणींचे खून झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात, त्यांनी धर्मवीर एक आणि धर्मवीर दोन असे दोन चित्रपट काढले. या दोन्ही चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरल्याचे दाखवण्यात आले आहे. उद्देश एकच की आनंद दिघे साहेब कशाप्रकारे बहिणींचे रक्षण करायचे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुम्ही आनंद दिघे यांचे शिष्य आहात. तुम्ही राज्यातील बहिणींसाठी लाडकी बहिणी योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून बघणे यांना महिन्याला पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. पण तुमचे या लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांची गरज नाही. त्या स्वतः पैसे कमावू शकतात फक्त त्या जिथे पैसे कमवायला जातात, जिथे नोकरी करतात जिथे शिक्षण घ्यायला जातात, तिकडे त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत ही सुरक्षा तुम्ही दिली पाहिजे. त्यांना लाडकी बहीण योजनेची नव्हे तर, सुरक्षित बहीण योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार हे महाराष्ट्र पाहणार आहे असे योगेश चिले यांनी व्हिडिओद्वारे म्हटले आहे.25 जुलै रोजी उरण येथील 22 वर्षे यशश्री शिंदे ही बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह सापडला. यशश्री शिंदे बेलापूर मध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. 25 जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली मात्र, तेव्हापासून ती बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशश्री बेपत्ता असल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली. यशश्रीचा शोध घेत असताना पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ झाडीत एक मृतदेह आढळला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाब दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.