शाळेत घर की घरात शाळा गोवळकोट येथिल जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थीती
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील दरडग्रस्त आठ कुटुंबियांचे पुनर्वसन जिल्हा परिषद मराठी शाळेत करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून शाळेतील विद्यार्थ्यांची वर्ग खोल्याअभावी गैरसोय होत आहे. दरम्यान, यापूर्वी शाळेत १७ विद्यार्थीसंख्या असताना यावर्षी ती ३२ वर गेल्याने सध्या एकाच वर्ग खोलीत या विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थी व शिक्षकांचीही कोंडी होवू लागली असल्याने या संबंधित दरडग्रस्त कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.शहरातील गोवळकोट बौद्धवाडी येथे जुलै २०१५ मध्ये दरड कोसळून १५ कुटुंबियांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तत्कालीन तहसीलदारांनी संबंधित कुटुंबियांना घराबाहेर काढून तेथील सर्व घरे बंद केली होती. आजतागायत ही घरे उघडण्यात आलेली नाहीत. उलट गळतीमुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी संबंधित कुटुंबियांची तात्पुरत्या स्वरूपात पर्यारी व्यवस्था गोवळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत केली आहे. या शाळेत ८ कुटुंबियांचे तर पेठमाप येथे ७ कुटुंबियांचे पुनर्वसन केले आहे. त्यानंतर या कुटुंबियांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न झाले. मात्र त्यामध्ये यश आलेले नाही. कापसाळ येथील पाटबंधारे विभागाची जागा पुनर्वसनासाठी निश्चित केली होती. मात्र त्यालाही अद्याप राज्य शासनाची मान्यता मिळालेली नाही. परिणामी त्याचा थेट परिणाम गोवळकोट जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर झाला आहे.www.konkantoday.com