वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी व्हावे कुटुंब, समाजाचे मार्गदर्शक : राजेंद्रप्रसाद मसुरकर
रत्नागिरी प्रतिनिधी : अलीकडे अल्पवयीन आणि मध्य धुंद बेदरकार आणि विशिष्ट वाहन चालकांमुळे हिट अँड रन सारख्या घटना वाढीस लागल्या आहेत, त्यामुळे निष्पाप लोकांचे नाहक बळी जात आहेत, भारतातील अपघात व अपघाती मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनाच्या कार्यात ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनात्मक प्रतिपादन ‘मोटार जगत’चे संपादक आणि वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले. ‘कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघा’च्या वतीने आज दिनांक २७ जुलै रोजी संपन्न झालेल्या मासिक स्नेह मेळाव्यात श्री. मसुरकर यांनी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे ‘ज्येष्ठ नागरिकांची रहदारीतील सुरक्षा’ याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे हे होते.सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीच्या परिस्थितीविषयी प्रबोधन करताना श्री. मसुरकर म्हणाले की जगातील सर्वाधिक रस्ते अपघाती मृत्यू भारतात होतात. रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांपैकी सर्वाधिक ४१.९% प्रमाण २४ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती असतात. दर मिनिटाला एक अपघात आणि साडेतीन मिनिटांनी एक मृत्यू अशी भयानक अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. चालकांमधील बेदरकार वृत्ती, वाहनांची वाढती गर्दी, नियम पाळण्याबाबत अनास्था इत्यादी कारणांमुळे अपघातांची संख्या वाढते. म्हणून ज्येष्ठ आणि मॉर्निंग वॉक, बागेत तसेच बाजारपेठेत जाताना अथवा नातवंडांना शाळेत सोडायला जाताना पुरेशी काळजी घेऊन स्वतःची सुरक्षितता पहावी, असे आवाहन त्यांनी केले. आपली मुले आणि नातवंडासह कुटुंबाचे आणि त्यायोगे समाजाचे मार्गदर्शक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. वाढत्या वयानुसार शारीरिक क्षमता कमी होणे, मधुमेह, रक्तदाब अशा विकारांचा शरीरात शिरकाव होणे याबरोबरच औषधांमुळे विशिष्ट वेळ झोप लागणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे असे ते म्हणाले. श्री. मसुरकर गेली २५ वर्षे सुरक्षित वाहतुकीविषयी विविध व्यासपीठावरून प्रबोधन करीत असून आजचा त्यांचा १३२ वा कार्यक्रम होता. ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जुलै महिन्यात वाढदिवस असल्याने ज्येष्ठांचे शुभेच्छापत्र आणि आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्री. श्यामसुंदर सावंत देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर तसेच प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी मार्गदर्शक श्री. मसुरकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र इनामदार यांनी प्रोजेक्टर साहित्य उपलब्ध होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले. संघाचा पुढील मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केल्याचे अध्यक्ष अंबरे यांनी जाहीर केले. संघाचे कोषाध्यक्ष श्री. मुकुंद जोशी, सचिव श्री. सुरेश शेलार, श्री सुधाकर देवस्थळी, नारायण नानिवडेकर व कार्यकारीणी सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर मनोहर चांडगे यांच्या आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने या मेळाव्याची सांगता करण्यात आली.