मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी बोलावं-प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र जळतोय, जे सत्तेत येण्यासाठी लढत आहेत, त्यांनी ज्या प्रश्नावर महाराष्ट्र जळतोय त्यावर भूमिका घ्यायची नाही. त्याची कारणं काय हे मी लोकांसमोर मांडलं आहे. त्यांनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं पण मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी बोलावं असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.आरक्षण बचाव यात्रा ही सोलापूरमध्ये पोहचली त्याठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी आम्ही आरक्षणावर जनजागृती करत आहोत. शरद पवार यांनी आरक्षणावर जे विधान केले ती राजकीय पळवाट आहे. पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आला तर तुम्हाला याला तोंड द्यावं लागणार आहे. तुम्हाला उद्या तोंड द्यायचे असेल तर जरांगे यांच्या मागणीच्या तुम्ही बाजूने आहात की विरोधात आहात हे तुम्हाला स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. या पळवाटा म्हणजे हे सगळेजण ओबीसींच्या विरोधातले आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केली.तसेच राजकीय भूमिका घेतली तर त्या भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो. आम्ही भूमिका घेतली त्यावर मराठा आणि ओबीसीही नाराज नाही. ही व्यवहार्य भूमिका आहे. मी जरांगे, हाके सगळ्यांनाच भेटायला गेलो होतो. कुणाला भेटल्याने भूमिका बदलत नाही. गरीब मराठा आणि ओबीसी यांचं २ ताट हवेत, ही संकल्पना वंचितची आहे. ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवता येऊ नये ही आमची मागणी आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर वेगळे दिले पाहिजे. त्याचा वेगळा विचार होऊ शकतो असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.