सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर – राणेवाडी येथील दोन सख्या भावांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
_अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. ही घटना राधानगरी – फोंडा राज्य मार्गावर अभयारण्य क्षेत्रातील मांढरेवाडी शेळप दरम्यान अपघात झाला.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर – राणेवाडी येथील दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुजल चंद्रकांत राणे (वय – २० ) व सचिन चंद्रकांत राणे ( वय २३) असे त्यांचे नाव आहे. अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्यांच्या मृत्यू झाला, असल्याची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला.सुजल व सचिन हे दोघे सख्खे भाऊ आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक ( एमएच ०७ एक्यू ९७४१ ) घेऊन कोल्हापूर येथे जाण्यासाठी घरातून बुधवारी सकाळी ६ वाजता बाहेर पडले. सचिन हा कोल्हापूर येथे एका हॉटेल मध्ये कामाला होता. पावसाने हाहाकार उडाला होता त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये सचिन कामाला होता त्या हॉटेलमध्ये पाणी भरल्यामुळे ते हॉटेल बंद होते. ते दोघेही तेथे न थांबता माघारी परतले होते. आपल्या मूळ गावी निघाले असताना मांढरेवाडी शेळप दरम्यान असलेल्या ओढ्याजवळ आल्यावर त्यांच्या ताब्यातील दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली.