सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर आता भाजपाचा दावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर आम्ही दावा करणार असून, महायुतीमधील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कणकवली मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे; पण कुडाळ मतदारसंघावरील दावा आम्ही सोडणार नाही.सावंतवाडी मतदारसंघातील वादावर लवकरच तोडगा काढू, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे चाकरमान्यांना त्रास होत आहे. या रस्त्याची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. आता उर्वरित कामे गणेश चतुर्थीपूर्वी केली जाणार असल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे भाजपची जिल्हा कार्यकारणी सभा शुक्रवारी झाली. सभेनंतर ना.चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी निलेश राणे, माजी आ. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हा चिटणीस रणजीत देसाई, संजू परब, राजन म्हापसेकर उपस्थित होते.