रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या आर्थिक वर्षात सभासदांना ३० टक्के लाभांश देऊन सहकार क्षेत्रात देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर विक्रम- अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे

*_रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या आर्थिक वर्षात सभासदांना ३० टक्के लाभांश देऊन सहकार क्षेत्रात देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर विक्रम केला आहे. एवढा लाभांश देणारी सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक ही पहिलीच असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.थिबापॅलेस येथील जयेश मंगल कार्यालयात जिल्हा बँकेची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर, उपसरव्यवस्थापक अजित नाचणकर, राजन होतेकर, श्रीकृष्ण खेडेकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. जिल्हा बँकेमार्फत गेली अनेक वर्षे सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येत होता. गतवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे यंदासभासदांना ३० टक्के लाभांश दिला. बँकेने ४ हजार ६०० कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेने नाबार्ड, आरबीआयच्या सर्व तरतुदींचे पालन करत सभासदांना लाभांश दिला. २५ टक्के लाभांश, ५ टक्के शेअर्स सभासदांना देण्यात येणार आहेत. बँकेने जाहीर केलेल्या ३० टक्के रकमेची नफा वाटणी करण्यात आली. सभासदांना ५ टक्के बँक शेअर्स खरेदी करताना देण्यात येणारी रक्कम एक हजार रुपयांच्या पटीत करण्यात आली. २९ जुलैला सभासदांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले. त्यासाठी बँकेला १८ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. माजी कार्यकारी संचालक सुनील गुरव, समर्थ भंडारी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर, सुधाकर सावंत, अशोक कदम, राकेश जाधव, प्रियदर्शिनी ग्रामीण पतसंस्थेचेअध्यक्ष हनिफ हरचिरकर, दीपक राऊत, सुरेश सावंत, शामराव सावंत, सुनील टेरवकर, विनायक मोहिते आदींनी जिल्हा बँकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले तर आभार उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी मानले.ढोबळ नफा ६८ कोटी ५३ लाखमार्च २०२४ अखेरीस ताळेबंदाचा आढावा सादर करण्यात आला. बँकेच्या एकूण ठेवी २६३६.१७ कोटी, २००४.३० कोटी रुपयांची कर्जे, ९७ टक्के वसुली करण्यात आली आहे. सलग १२ वर्षे शुन्य टक्के एनपीए असून, ६८ कोटी ५३ लाख रुपयांचा जिल्हा बँकेला ढोबळ नफा झाला आहे. ५९.६४ कोटी रुपयांचे भागभांडवल असून सतत १३ वर्षे ‘अ” ऑडिट वर्ग जिल्हा बँकेला मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या २३ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. असे डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button