रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे शहर भाजपची आक्रमक भूमिका
रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे शहर भाजपने गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, एसटी स्टॅंड, तेलीआळी नाका व जयस्तंभ येथे प्रतिकात्मक वृक्षारोपण करत आंदोलन केले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी थेट खड्ड्यात बसून लोकांचे लक्ष वेधून घेतले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक मारली. या संदर्भात भाजप शहराध्यक्ष राजन फाळके व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यात सुधारणा न झाल्यास ५ ऑगस्टला स्वःखर्चाने खड्डे भरू, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी ठणकावले. या प्रसंगी खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करू असे आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले.शहरातील परिस्थितीविषयी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेत प्रश्नांचा भडीमार केला. शहरात जे डांबरीकरणाचे काम झाले त्याच्या खडीचा नमुना तपासला का, डांबराचा दर्जा तपासला आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या कामाचा दर्जा सुमार वाटतो, वारंवार खडी वाहून जात आहे. त्यामुळे पालिकेकडे अहवाल असेल तर तो आम्हाला दाखवा, असे मयेकर यांनी ठणकावून सांगितले तर माजी नगरसेवक राजू तोडणकर यांनीही शहरात डेंगीचे अनेक रुग्ण सापडत आहेत. एवढ्या मोठ्या शहरात फक्त चार माणसं फवारणी करत आहेत. ते शक्य नाही. माणसं वाढवा, अशी सूचना केली.या आंदोलनात शहराध्यक्ष राजन फाळके, माजी आमदार बाळ माने, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, प्रशांत डिंगणकर, शिल्पा मराठे, मंदार मयेकर, दादा ढेकणे, बाबू सुर्वे, विक्रम जैन, मन्सूर मुकादम, नितीन जाधव, मंदार खंडकर, नीलेश आखाडे, अमित विलणकर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.